Saturday, April 11, 2020

रात्र

सूर्य पाण्यात मिसळला
व किनाऱ्यावरची 
गर्दी संपली की 
समुद्र स्वतःची 
रात्र रंगवू लागतो 
घोंगावणारा वारा 
रात्रीच्या प्रकशात 
चमकत वाहू लागतो 
 अंधारात समुद्र
 वाहून जातो 
 लाटांची सफेद किनार 
तरंगत ठेवून 

लाटांच तांडव 
मनात सुरू होत 
व वाहता वारा
 तुम्हाला चौफेर घेरतो 
मग जमिनीच्या ओल्या 
स्पर्शाचा आधार घेत 
तुम्ही वाहू लागता 
वाऱ्यासोबत 
समुद्राच्या दिशेने 
रात्रीचा गर्भ शोधत  

 रात्रीच्या गर्भाचा 
शोध घेताना 
तुम्हाला कधी 
तुम्हीच भेटतात
 एका अथांग 
अस्तित्वा सोबत 
त्याचेच कण बनुन
मग वाटतं वाहत राहावं 
ओल्या मातीवरून 
हरवलेल्या अस्तित्वा सोबत 
कुणाचीही  हाक 
ऐकू येवू  नये तिथपर्यंत 

अथांग समुद्र 
गर्द अंधार 
वाजता वारा 
लाटांचा आवाज
 या मध्ये मिसळतो 
की समजत 
किनाऱ्यावर सोडलेल जग 
किती तोकड्या वाख्या 
घेवुन जगत असतं ...

- जतीन 

निर्जीव रात्र

 
रंगीत विचारांना घोळवत 
हळु हळू स्वप्न 
ब्लॅक अँड व्हाईट होत जातात 
 एक एक घोट रात्र संपत असते 

ब्लॅक कॉफी सारखी फिकट काळपट  
किंवा ओल्ड माँक मध्ये 
 टाकलेल्या थुमस् अप सारखी 
 काळी गडद 

काय अपूर्ण असतं माहीत नाही 
पण अंधरातली पोकळी 
उजेडात सापडत नाही 
आणि कुठल्याच व्याख्ये मध्ये 
रात्र काही बसत नाही 

मग तीच पोकळी गडद होऊ लागते 
वेग वेगळे वादळ घेवुन 
प्रत्येक खोली हेच जाणवून देते  
सगळं काही शून्य आहे 
उगीचच बेरीज वजाबाकी चा खेळ आहे

तुम्ही आहे मी आहे 
तुम्ही नाही मीही नाही 
उजेडातही अंधार दिसत नाही 
कारण अंधार अंतिम आहे 

मन थोड उथळ करून 
 निरर्थक जीवनाला स्वार्थ जोडला 
की वाटतं जगुन पहाव 
निदान टाईमपास म्हणून 

रात्र अपूर्णच राहते कायम 
दिवस व्यवस्थित संपत असतो 
कधी संपेल रात्र व्यवस्थित 
हा रोजचा प्रश्न असतो 

निर्जीव रात्र - जतिन 

Friday, March 2, 2018

विकास रेडी आहे

मोठ कॉन्ट्रॅक्ट निघालय
झाला खर्च तरी चालेल
ही समस्या अशीच निपटेल
याची आम्हाला खात्री आहे

खुप मोठी चादर हवी
बरच काही झाकायच आहे
सत्तर टक्के देश व्यापला जावा
एव्हड क्षेत्रफळ हवं आहे

उपचारा अभावी पडलेले रोगी
शिक्षणा अभावी सडणारी डोकी
उपाशी पोटी भटकणारे देह
चौफेर असलेली गरिबी
हे सारं काही विद्रुप आहे

खरं सांगतो तुम्हाला ही चादर
देशासाठीच हवी आहे
नाही पटलं तुम्हाला तर
पटवुन देणाऱ्या जाहिरातींचा
बजेट ही मोठा आहे

फक्त हे काम केलं की
पंचतारांकित हा देश आहे
बुलेट ट्रेन, मोठे पुतळे
दाखवण्यासाठी बरच आहे

बरच काही झाकुन
दिखावू विकास साधायचा
हा फार्मुला आजकाल
सहज साध्य आहे

तुम्ही म्हणाल हे शक्य नाही
एव्हडी मोठी चादर
मार्केट मध्ये मिळणार नाही

स्पष्ट सांगायचं तुम्हाला
तर चादर तयार आहे
ती टाकायचं काम ही
जोरात चालु आहे

चादर फाडुन कधी
बाहेर निघणार नाही
मोकळी हवा घेणारी डोकी
हिच खरी समस्या आहे

खरं सांगु तुम्हाला
आमचा विकास रेडी आहे .

__ जतिन

#jatinsankhepoetry

जीवनचक्र

पानगळ सुरू होते
काळ सरत जातो
झाड ओसाड होत जात
मग पुन्हा येते कोवळी
हिरवीगार पालवी
बहरून टाकते वृक्षाला

अंधार दाटुन येतो
रात्र सरकत जाते
सारं विश्व लुप्त होत
दाटलेल्या काळोखात
मग हलकेच येतात
कोवळी किरणे
नवीन ऊर्जा देत विश्वाला
थंडावलेल्या क्रिया
पुन्हा जाग्या होतात
व पळू लागतात
लाजवून वेगाला

शरीर भिजुन जाते घामाने 
तप्त धरणी आग ओकते
रविकिरने देवु पाहतात
कडक लाल पहारा
काळ सरू लागतो
काळे ढग जमू लागतात
सुटतो सोसाट्याच्या वारा
सुरू होतात पाऊस धारा
तृप्त होऊनी माती
बहरून येते हरित तृणांने
वाहु लागतात नद्या साऱ्या

अदृश्य होत समोरचं सार 
एवढ्या समस्या दाटुन येतात
चिंता अस्वस्थता असुरक्षितता
घेरून टाकतात जीवाला
वेळ शोधत असते
पर्याय आपल्या सोबत
तुम्ही तग धरून
टिकलात हिंमतीने
की वेळच देवु लागते उत्तरे 
सृष्टीचक्राच्या नियमाने

मग पुन्हा फुटते नवीन पालवी
कोवळी किरणे जागी करतात
वाहु लागतात पाऊस धारा ...

- जतिन #jatinsankhepoetry

Wednesday, December 6, 2017

अस्तित्व

लाटांना मुळीअस्तित्वच नसत
प्रवाहाच्या दिशेने पळत असतात त्या
क्षणात ऊँच उसळतात
व क्षणात नाहिश्या होतात
एक संपली की दूसरी तयारच असते
मग आपण उगीचच गंतुन राहतो
.
.
.
भावनांचही तसच असत.

- जतिन

लाटा

लाटांना ऊंची असते तर
समुद्राला खोली असते

लाटांना आवाज़ असतो
तर समुद्र शांत असतो

लाटा कितिही उनचाऊँ
सांगत असल्या तरही

अथांगता समुद्राच्या
शांतातेत दडलेली असते

समुद्राच्या गुढते मध्ये
लपलेल्या भावनांचा
किनार्यावर बरसलेल्या लाटा
हया उद्रेक असतात

म्हणुन लाटाही समुद्राचाच
भाग असतात .
.......... ज़तिन

मनाचं अंतराळ

मन धावत असते
रात्र संपत जाते

इवल्या इवल्या
पापण्यां च्या आड़
विश्व निद्रेत जाते

अंधारलेल्या देखाव्यात
मन अफ़ाट बनते

आकार हरवून
विचार सारे
धावत सुटतात
दिशा विसरून

शरीर तिथेच असते
हरवलेल्या विश्वात

धड़ प्रश्न ही नसतात
ना उत्तर असतात
एक पोक़ळी असते
विचारांच्या वादळात

आकार दिशा अस्तित्व
सारे मागे पड़ते
शरीर पृथ्वी बनते
मनाच्या अंतराळात....             

  - जतिन