भिजलेल्या रस्त्यावरुनी
उन्हे लपत चमकत होती
गर्द काळ्या ढगा आडुनी
किरणे चोरुनी पाहत होती
गवताच्या पात्यावर
दवबिंदू होते विसावलेले
तृप्त होऊन भिजलेली धरणी
नवीन गीत गात होती
हवेत होता गारवा
बेधुंदपणे पिसाटलेला
रातकिड्यांचा आवाजहा
अंधाराला साथ होती
रस्ते विसरून पाणी
चोहीकडे वाहत होते
दगडावर आपटुनी
अस्तित्व हे उधळीत होते
नजर हिरवीगार जाहली
थंडावा हृदयात बसला
श्रावणात गायलेले
सृष्टीचे हे गीत होते .
------ जतीन .